-
डिचोली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनानंतर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांची पोलीस उपमहानिरीक्षकांची भेट घेऊन मागणी
-
पोलीस उपमहानिरीक्षकांचे प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन
अशी मागणी का करावी लागते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पणजी : शांतताप्रिय आणि सांप्रदायिक ऐक्य असलेल्या गोव्यात आंतकवाद्यांशी संबंध असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ ३ ठिकाणी फेर्या काढण्यामागील हेतू काय होता ? या फेर्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी कोणत्या आधारावर अनुमती दिली ? या फेर्यांच्या आयोजनासाठी निधी कुठून पुरवला गेला ? गोव्यात फेरी काढणारे आणि राष्ट्रविघातक रोहिंग्या मुसलमान यांचा कोणता संबंध आहे ? या सर्व गोष्टींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी गोवा राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याकडे केली आहे. देशात रोहिंग्यांना आश्रय न देण्याच्या मागणीला अनुसरून डिचोली येथे ८ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांची भेट घेतली.
शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर, शिवसेनेच्या गोवा विभागाचे माजीप्रमुख श्री. रमेश नाईक, छत्रपती शिवाजी महाराज संघटनेचे श्री. किरण नाईक, वाळपई येथील शिवप्रेमी संघटनेचे श्री. विश्वराज सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी यांचा सहभाग होता. पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले. (हे पोलिसांनी स्वत:हून करायला हवे होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) शिष्टमंडळाने यानंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन् यांचीही भेट घेऊन त्यांनाही रोहिंग्यांच्या समर्थनार्थ गोव्यात निघालेल्या फेर्यांसंदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी मोहनन् यांनीही शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून आवश्यक कृती करणार असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्या नजरेस आणून दिले की, गोव्यात बांगलादेशी घुसखोर अधिकोषांच्या एटीएम्च्या चोर्यांमध्ये सहभागी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. जिहादी आतंकवादी यासीन भटकळ यालाही गोव्यात कह्यात घेण्यात आले होते. गोव्यात रोहिंग्यांच्या समर्थनार्थ ज्या फेर्या झाल्या, त्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेशी काय संबंध होता, याचाही शोध घेतला पाहिजे. रोहिंग्यांच्या समर्थनार्थ वास्को येथे फेरीचे आयोजन करणारी प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फ्रंट आणि रोहिंग्या यांचा काय संबंध आहे, याचाही शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. गोवा पोलीस सावधानता बाळगण्याच्या अनुषंगाने आताच रोहिंग्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करणार कि पुढे मोठी अप्रिय घटना घडण्याची वाट पहाणार ? असा प्रश्नही या वेळी शिष्टमंडळाने उपस्थित केला. भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे आणि म्यानमारमधील विस्थापित हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्या रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करून जातीय तणाव निर्माण करणार्या भारतातील मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये, अशा मागण्या करणारे निवेदनही या वेळी पोलीस उपमहानिरीक्षकांना देण्यात आले. या निवेदनाची मूळ प्रत केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांना पाठवण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात