चेंदवण : छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री भवानी मातेचे आशीर्वाद आणि संतांच्या कृपाशीर्वादाने ५ मुसलमान पातशाह्यांना नमवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसेच क्रांतीकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागामुळेच भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली; परंतु सुराज्य मिळालेले नाही. हे सुराज्य हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून आणण्यासाठी हिंदूंनी आपल्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दैवेश रेडकर यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील श्री देव पाताळेश्वर मंदिरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. विजय मेस्त्री यांनी शंखनाद केल्यावर सभेला प्रारंभ झाला. श्री. रेडकर पुढे म्हणाले, मंदिरे ही हिंदूंना धर्मशिक्षण देणारा प्रमुख स्रोत आहे. यासाठी सर्वांनी मंदिरांचे पावित्र्य आणि चैतन्य टिकवण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन प्रयत्न केला पाहिजे.
या सभेला चेंदवण गावचे सरपंच श्री. देवेंद्र नाईक, उपसरपंच श्री. नारायण शृंगारे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सूर्यकांत शृंगारे, तसेच कवठी गावच्या सरपंच सौ. अमृता पार्सेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. मंगेश बांदेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. संजय परब आणि कवठी गावचे पोलीस पाटील श्री. देवदास राणे हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि सभा यांविषयी चांगले मत व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. सभेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता. त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली होती. यासंदर्भात तेथील स्थानिक युवकांचे प्रबोधन केल्यावर त्यांनी पुतळ्याची आणि परिसराची स्वच्छता केली अन् पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
२. चेंदवण येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. दादा ठुंबरे यांचा मुलगा श्री. दर्शन ठुंबरे याने त्याच्या मित्रांना एकत्र करून सभास्थळाची स्वच्छता केली.
३. या वेळी दाखवण्यात आलेल्या स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके पाहिल्यावर २ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
४. गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण असतांनाही सभेला २०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच सर्वजण सभेची सांगता होईपर्यंत बसून होते.
सभा यशस्वी होण्यासाठी साहाय्य केलेल्यांचे आभार !
१. सर्वश्री नारायण शृंगारे, सरपंच देवेंद्र नाईक, संजय नाईक यांनी सभेसाठी धनाच्या स्वरूपात साहाय्य केले.
२. श्री गणेश, माऊली, पाताळेश्वर कला-क्रीडा मंडळाने सभेसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली, तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सभेपूर्वी ढोलवादन करून वातावरण निर्मिती केली.
३. सर्वश्री बाबू नाईक, नारायण पाडगावकर यांनी लोकांनी सभेला येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात