Menu Close

गोमातेचे आध्यात्मिक महत्त्व, तिची सेवा केल्यामुळे होणारे लाभ आणि तिचे रक्षण करणाऱ्यांना मिळणारे फळ

१. हिंदु धर्मशास्त्राने विशद केलेले गायीचे महत्त्व

‘हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे.

२. आध्यात्मिकदृष्ट्या गायीचे महत्त्व

अ. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा सर्वांत सात्त्विक प्राणी आहे.

आ. गोमातेच्या देहातील विविध ठिकाणी विविध देवतांचा सूक्ष्मातून वास आहे. गोमातेमध्ये ३३ कोटी देवतांची तत्त्वे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याचे सामर्थ्य आहे.

इ. गोमातेचे दूध, गोमय आणि गोमूत्र हे तिन्ही अतिशय सात्त्विक अन् चैतन्यमय असल्यामुळे त्यांपासून पंचगव्य (दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय यांचे एकत्रीकरण) बनवले जाते. पंचगव्य प्राशन केल्यामुळे पिंडाची शुद्धी होते. त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये पंचगव्याचा उपयोग केला जातो.

ई. गोमातेच्या अस्तित्वामुळे भूमी आणि वायूमंडल यांची शुद्धी होते.

३. गोवंशाच्या हत्येचे होणारे दुष्परिणाम

अ. भूतलावरील सात्त्विकता वृद्धींगत करणार्‍या सात्त्विक प्राण्याची हत्या केल्यामुळे भूतलाची सात्त्विकता उणावते. त्यामुळे गोमातेची हत्या करणार्‍या व्यक्तीला समष्टी पाप लागते.

आ. गोमातेची हत्या करणार्‍या व्यक्तीची अधोगती होऊन तिला मृत्यूनंतर पाचव्या नरकात शिक्षा भोगावी लागते. (टीप)

इ. गोमातेच्या हत्येला अप्रत्यक्ष साहाय्य करणारे, उदा. वृद्ध झालेल्या गोमातांना कसायांना विकणारे आणि गोमातेच्या हत्येसंदर्भात मूकसंमतीदार असणारे, उदा. गोमातांना वाहनांत कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे पाहूनही त्याविषयी काहीही न करणारे हेही महापापी ठरतात. (टीप)

ई. गोमांस भक्षण करणारा मनुष्य महापापी असून त्याला पुढील जन्म असुर योनीत मिळतो. (टीप)

४. गोमातेची सेवा करणार्‍यांना मिळणारे फळ

गोमातेचे पूजन आणि गोमातेची मनोभावे सेवा करणार्‍यांना गोमातेचे कृपाशीर्वाद मिळतात आणि त्यांना पुष्कळ प्रमाणात पुण्य लाभते. या पुण्यबळावर त्यांना मृत्यूनंतर देवलोकात निवास करण्याची संधी मिळते. (टीप)

५. गोमातेचे रक्षण करणार्‍यांना मिळणारे फळ

गोमातेचे रक्षण करणार्‍या व्यक्तीला सलोक मुक्तीची प्राप्ती होते (टीप) आणि तिला विविध देवतांचे कृपाशीर्वाद लाभतात.’

टीप – सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.६.२०१७)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *