राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे प्रकरण
राष्ट्रध्वजाचा अवमान राष्ट्रप्रेमींच्या निदर्शनास येतो; मात्र सरकारच्या निदर्शनास येत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे. या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.चे चिन्ह (लोगो) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रीय भावना दुखावल्याच्या प्रकरणी राजगुरुनगर तालुक्यातील मोई येथील श्री. किसनराव फलके यांनी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडे ‘परसेप्ट लाईव्ह’ या आस्थापनाच्या विरोधात तक्रार केली आहे. ‘या प्रकरणी आवश्यक ती चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात येईल’, असे महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकारी दयम्मा यांनी सांगितले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. रघुनाथ ढोबळे यांनीही राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या प्रकरणी पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधीक्षक राधिका फडके यांनी तक्रार नोंदवून घेतली.७७ वर्षीय श्री. फलके यांनी तक्रार करतांना म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाचे विडंबन म्हणजे ज्या क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी प्राणार्पण केले, त्यांचा अवमानच आहे. स्वतंत्र भारतात अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे.राष्ट्राशी द्रोह करणार्यांची जागा कारागृहात आहे. या प्रकरणी संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट व्हायला हवा. (वयाच्या ७७ व्या वर्षीही राष्ट्राच्या सन्मानासाठी धडपड करणारे श्री. किसन फलके यांनी आजच्या तरुणांसह सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. राष्ट्रद्रोह आणि संस्कृतीद्रोह करणारे ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजक अन् त्यांचा समूह यांच्यावर जागोजागी गुन्हे प्रविष्ट झाले, तर पुन्हा राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात