हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? सरकार याविषयी स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मिरज : फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य अन् पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात तर दिवाळीच्या दिवशी सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात, तर वर्षभरातील ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रतीवर्षी सहस्रो कोटी रुपयांची होणारी उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल; म्हणून शासनाने अशा प्रदूषणकारी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
याचप्रकारे फटाके वाजवण्याची ही कुप्रथा बंद करत नागरिकांनी देशहितास हातभार लावावा, असे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले. ही पत्रकार परिषद १३ ऑक्टोबर या दिवशी किल्ला भाग येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आली. या वेळी सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस उपस्थित होत्या.
प्रशासनाने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी ! – अधिवक्ता समीर पटवर्धन
भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यात विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते. याच्या निर्मितीसाठी ‘पोटॅशियम क्लोराइड’ आणि ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे रासायनिक मिश्रणवापरले जाते; परंतु भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे. यामुळे चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. ‘एक्सप्लोजिव्ह अॅक्ट २००८’ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. असे असले, तरी अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्याची विक्री होते.
यामुळे अशा फटाक्यांवर प्रशासनाने तात्काळ बंदी आणावी, तसेच चिनी फटाक्यांची विक्री करणार्यांवरही कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केली. या पत्रकार परिषदेत धार्मिक भावना दुखावणार्या देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घाला, अशीही मागणी करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमाचे पत्रकारांकडून कौतुक
या वेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी हिंदु जनजागृती समिती फटाक्यांच्या संदर्भात राबवत असलेल्या अभियानाचे कौतुक केले. या संदर्भात समिती जे उपक्रम राबवील, त्याला आम्ही प्रसिद्धी देऊ, असे पत्रकारांनी सांगितले. या वेळी पत्रकारांनी हे अभियान आणखी चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी काही सूचनाही केल्या. ‘प्लास्टिकचे राष्ट्रध्वज बंद होण्यात हिंदु जनजागृती समितीचा सिंहाचा वाटा आहे’, असे एका पत्रकाराने सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात