फटाक्यांवर बंदी घालणे योग्य आहे का ?
प्रामुख्याने शहरी भागात फटाके फोडण्यावर बंदी असावी. कारण शहरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. शहरात फटाके जास्त प्रमाणात फोडले जातात. त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू जड असल्याने धूर वरच्या दिशेला जात नाही तर खालच्या बाजूलाच राहातात. हा धूर श्वासातून शरीरात जातो. त्यातून माणसांना आजार जडतात. या धुरामुळे दम्यासारखे आजार उसळतात. धुरामुळे प्राणवायूचे प्रमाणही कमी झालेले असते. त्यामुळे दम्याचा रुग्ण गुदमरतो. त्यामुळे ज्या भागात लोकसंख्येची घनता जास्त त्या ठिकाणी फटाके उडवण्यावर बंदी आवश्यक आहे.
सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आवश्यक आहे का ?
प्रत्येक फटाक्यावर किती डेसिबल आवाज आहे त्याची नोंद असते. दिवाळीत फटाके दोन दिवस फोडण्यास परवानगी दिली तरी दोन दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. फटाके फोडताना आवाजावर कोणाचेही नियंत्रण नसते. फटाक्यांच्या आवाजाची नोंद ठेवण्यासाठी डेसिबल मीटरची पोलिसांकडे गरज आहे. पण यासाठी कायदा किंवा शिक्षा करण्यापेक्षा लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. शिक्षा, दंड करण्यापेक्षा फटाक्यांवर बंदी घालणे योग्य राहील. रात्री दहाच्यानंतर फटाके फोडण्यास बंदी तर आवश्यकच आहे.
परदेशातही फटाके फोडतात ना ?
परदेशात फटाके वैयक्तिक पातळीवर फोडत नाहीत. परदेशात सार्वजनिक ठिकाणी शोभेचे दारूकाम केले जाते. मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी लोक वैयक्तिक पातळीवर फटाके फोडतात त्यापेक्षा मरिन ड्राइव्ह किंवा अन्य मोकळ्या ठिकाणी सार्वजनिक पातळीवर एकदाच फटाके फोडणे योग्य राहील. सार्वजनिक ठिकाणी शोभेचे फटाके लावले तर सर्वांनाच आनंद घेता येईल. खासगी पातळीवर फटाके फोडण्यास बंदी घालावी.
फटाक्याच्या आवाजाने कशा प्रकारे नुकसान होते ?
लहान बाळांपासून रुग्ण ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो. १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज होऊ नये. पण अचानक मोठा आवाज कानावर पडल्याने कोणताही माणूस दचकतो. ज्यांना हृदयरोग आहे अशांना तर मोठा आवाज घातकच ठरतो. त्यातून एखाद्याचा मृत्यू ओढवू शकतो.
फटाके फोडण्याची भारतीय परंपरा खंडीत होत आहे ?
फटाके फोडण्याची भारतीय पंरपरा नाही. प्रभू रामचंद्र अयोध्येला आले म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. रामायणाच्या काळात फटाके होते का ? ही परंपरा कालांतराने म्हणजे जेव्हा फटाक्यांचा शोध लागला तेव्हा सुरू झाली. त्याला मोठी बाजारपेठ मिळाली म्हणून फटाके फोडण्यास सुरुवात झाली. दिवे लावणे पारंपारिक आहे, पण फटाके फोडणे ही आपली परंपरा नाही.
फटाके फोडू नयेत म्हणून जनजागृती कितपत आहे ?
गेल्या काही काळापासून जनजागृती वाढत आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर्स या संघटनेचे डॉ. यशवंत ओक यांच्या प्रयत्नांमुळे प्रामुख्याने ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात नियम आले आहेत. आता जनजागृतीही वाढत आहे. महाराष्ट्र विज्ञान परिषदेने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शपथपत्र तयार केले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये फटाक्यांच्या विरोधात जनजागृतीचे काम सुरू आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स