Menu Close

चर्नी रोड पुलाचे जिने कोसळले

मुंबई : एल्फिन्स्टन रोडमधील दुर्घटनेनंतरही पुलाच्या समस्या अधोरेखित करणाऱ्या घटना घडतच आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील स्लॅबचा भाग कोसळून महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारीच घडली असतानाच, शनिवारी चर्नी रोड स्थानकाला जोडणाऱ्या धोकादायक पादचारी पुलाच्या सुमारे १५ पायऱ्या कोसळल्या. रात्री घडलेल्या या दुर्घटनेत डोंगरसिंग रामचंद्र राव (६७) व अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाले.

महापालिकेचा हा पादचारी पूल ३५ ते ४० वर्षे जुना आहे. स्थानिकांनी पालिका प्रशासनाकडे तो धोकादायक बनल्याच्या लेखी तक्रारी केल्या होत्या. शनिवारी सकाळीच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून हा धोकादायक पूल लवकर पाडून नवीन पूल बांधण्याच्या सूचना केल्या होत्या.

शनिवारी पुलाच्या सुमारे १५ पायऱ्या कोसळल्या व दोन जण जखमी झाले. चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणारा बाबासाहेब जयकर मार्गाच्या दिशेच्या या पुलाच्या पायऱ्या कोसळल्या त्यावेळी फारशी वर्दळ नसल्याने अधिक नुकसान झाले नाही. या दुर्घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर हा पादचारी पूल प्रवाशांसाठी बंद केला असल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

‘स्थानिकांनी या धोकादायक पुलाची माहिती आपल्याला दिल्यानंतर आपण पालिका अधिकाऱ्यांना हा पूल रहदारीसाठी बंद करण्याची सूचना केली होती. मात्र दुर्दैवाने रात्री दुर्घटनेची माहिती मिळाली. याच स्थानकाला जोडणारा दुसरा पूल पालिकेने अर्धवट तोडलेला आहे. त्याठिकाणीही नवा पुल बांधण्याची सूचना आम्ही केली आहे’, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *