Menu Close

सोमालियाच्या राजधानीवर दहशतवादी हल्ला, २३१ जणांचा मृत्यू

मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू रविवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरली. राजधानीमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये तब्बल २३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्याने डॉक्टरांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

राजधानीमधील के-५ इंटरसेक्शन भागात असणाऱ्या एका हॉटेलबाहेर उभ्या असणाऱ्या कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला आहे. या भागात अनेक सरकारी कार्यालय, रेस्टॉरंट, टेलिफोन सेवा आणि अन्य महत्त्वाच्या इमारती आहेत. स्फोट झाला तेव्हा या भागात लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटानंतर अनेक वाहनांमध्ये आग लागल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. या स्फोटानंतर दोन तासानंतर मेदिना जिल्ह्यामध्येही एक बॉम्बस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २००७ नंतर झालेला हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

स्फोटाप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये आतापर्यंत २३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र अलकायदा या दहशतवादी संघटनेसोबत जोडलेल्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेचे हे कृत्य असावे असा संशय कॅप्टन मोहम्मद हुसैन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल्लाह मोहम्मद यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

संदर्भ : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *