Menu Close

दीपावलीच्या पूर्वसंध्येला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीकृष्ण फेरी

साळगाव येथे श्रीकृष्णाच्या प्रतिमेला नमस्कार करतांना सौ. स्मिता नाईक (उजवीकडे)

सिंधुदुर्ग : सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन अन् नरकासुर प्रतिमांचे दहन करण्याची अयोग्य प्रथा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुदर्शी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांचा छळ करणार्‍या नरकासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले; परंतु काळाच्या ओघात ज्याचा वध केला, त्याच नरकासुराचा उदो उदो होतांना दिसतो. नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने अयोग्य संस्कार युवकांच्या मनावर बिंबतात अन् मुले वाईट मार्गावर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे युवा पिढीने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील साळगाव, वालावल आणि आंदुर्ले या ठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजे १७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता श्रीकृष्ण फेरी आयोजित करण्यात आली होती.

वालावल येथे श्रीकृष्ण फेरीत सहभागी हिंदुत्वनिष्ठ

वालावल : रेवटीवाडी येथील श्री साई हनुमान मंदिरात श्रीफळ ठेवून आणि श्रीकृष्ण पूजन करून फेरीला आरंभ करण्यात आला. धर्माभिमानी श्री. महेंद्र देसाई यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले. श्री. अरुण शेवडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. श्री देव रवळनाथ मंदिरात फेरीची सांगता झाली. या वेळी समितीचे श्री. संजोग साळसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आंदुर्ले : कापडोसवाडी येथून श्रीकृष्ण फेरीला आरंभ झाला. हिंदुत्वनिष्ठ श्री. दत्तप्रसाद सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील प्रतिष्ठितांसह अनेक धर्माभिमानी या फेरीमध्ये सहभागी झाले होते. फेरीची सांगता श्री देवी आंदुर्लाई मंदिरात झाली. या वेळी श्री. राजेंद्र पाटील आणि श्री. सुरेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

साळगाव : सौ. स्मिता नाईक यांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर फेरीला आरंभ झाला. फेरीच्या मार्गावरील १० ग्रामस्थांनी सहकुटुंब श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन केले. साळगावची ग्रामदेवता श्री देवी माऊली मंदिर येथे फेरीची सांगता झाली. समारोपाच्या वेळी श्री. ऋषिकेश धुरी यांनी उपस्थितांना दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले. ८० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ फेरीत सहभागी झाले होते.

वालावल येथील श्रीकृष्ण फेरीची क्षणचित्रे

१. येथील फेरीच्या वेळी पाऊस पडू लागला, तरीही फेरीत सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी फेरी पूर्ण करूया ! असे ठामपणे सांगितले. त्यामुळे पावसातही फेरी पूर्ण झाली.

२. श्री. अनिल मयेकर यांनी फेरीसाठी ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.

३. काही वयस्कर हिंदुत्वनिष्ठही फेरीमध्ये थोडावेळ सहभागी झाले होते.

४. ६ ठिकाणी फेरीचे पूजन करण्यात आले.

५. फेरीच्या प्रारंभी एक फुलपाखरु श्रीकृष्णाच्या प्रतिमेवर बसले आणि फेरीचा शेवट होईपर्यंत एकाच जागेवर स्थिर बसले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *