अशी अवैधरित्या चिनी फटाक्यांची विक्री होत असतांना, ती इतकी वर्षे लक्षात न येणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे ! अशी स्थिती असेल, तर सरकार छुप्या आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढवणार्या चिनी फटाक्यांवर वर्ष १९९२ पासून बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही प्रतीवर्षी छुप्या मार्गाने दीड सहस्र कोटी रुपयांचे फटाके येथील बाजारपेठेत विकले जातात. मेक इन इंडियाचे बनावट लेबल लावून त्याची सर्रास विक्रीही केली जाते. या फटाक्यांमध्ये सल्फर आणि पोटॅशिअम क्लोरेटचे प्रमाण अधिक असल्याने दमा, बहिरेपणा, अंधत्व असे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो.
१. स्वस्त दरात मिळणार्या चिनी फटाक्यांमधील सल्फरमुळे टॉक्झिक ऑक्साइड निर्माण होऊन त्यामुळे डोळे चुरचुरतात आणि श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो.
२. या फटाक्यांमधील पोटॅशियम क्लोरेटमुळे त्वचेला खाज सुटते, तसेच श्वसनास अडचण निर्माण होते. हा त्रास दीर्घकाळ टिकल्यास दमाविकार वाढून किडनी, तसेच मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. या विषयीची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी दिली.
३. मोटघरे पुढे म्हणाले की, मुंबईत राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या मैदानावर विविध २५ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुतळी बॉम्ब आणि दहा सहस्र फटाक्यांची माळ यांमध्ये ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण १२५ डेसिबल मानकापेक्षा अधिक आढळून आले.
४. त्याचप्रमाणे यावर्षी भुईचक्र, सापाच्या गोळ्या आणि १० सहस्रांच्या माळा यामध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात