राष्ट्रभक्त नागरिकांच्या दबावामुळे निर्णय
आतंकवादाची सर्वाधिक झळ बसत असलेला भारत असा योग्य निर्णय कधीतरी घेईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
क्युबेक (कॅनडा) : सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती क्युबेक प्रांताचे अधिकारी फिलिपी कौइलार्ड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. राष्ट्रभक्त नागरिकांच्या दबावानंतर क्युबेक प्रांत सरकारने हा निर्णय घेतला असून त्यासाठी एक कायदाही नुकताच संमत केला. या कायद्यामुळे आता प्रांतातील कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी वावरतांना स्वत:चा तोंडवळा (चेहरा) झाकता येणार नाही. गेल्या काही वर्षांत क्युबेकमध्ये हिंसाचार वाढला आहे. जानेवारीमध्ये एका मशिदीवर झालेल्या आक्रमणात ६ जण ठार झाले होते.
बुरखाबंदीच्या कायद्याविषयी अधिक माहिती देतांना फिलिपी कौइलार्ड म्हणाले, फ्रान्समधील बुरखाबंदीच्या कायद्याच्या धर्तीवर क्युबेक सरकारने हा कायदा सिद्ध केला आहे. क्युबेकमध्ये उत्तर आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी स्थलांतर केले आहे. परिणामी येथील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यास येथील राष्ट्रभक्त नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कोणाचीही ओळख लपून राहू नये, एकमेकांशी संभाषण करता यावे, राष्ट्रीय सुरक्षा अबाधित रहावी आणि सरकारी सेवेचा लाभ विनाअडथळा घेता यावा, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याची नेमकी कार्यवाही कशी करणार, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड्स, बल्गेरिया आणि जर्मनी यांनी आपापल्या प्रांतात यापूर्वीचा बुरखाबंदी लागू केली आहे.
हा कायदा म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – नॅशनल काऊन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम
हा कायदा म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. आम्ही या कायद्यातील कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करत आहोत, अशी प्रतिक्रिया नॅशनल काऊन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिमचे पदाधिकारी इशान गार्दी यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात