संयुक्त राष्ट्र : अणूयुद्ध कोणत्याही क्षणी प्रारंभ होऊ शकते, अशी चेतावणी उत्तर कोरियाने दिली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त सैन्य सरावामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने अमेरिकेच्या गुआम या कॅरेबियन बेटावर क्षेपणास्त्राने आक्रमण करण्याची पुन्हा धमकी दिली आहे. आमचा देश संपूर्णपणे अणूसंपन्न झाला आहे आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या मारक टप्प्यामध्ये आहे, अशा प्रकारची चेतावणी संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उपउच्चायुक्त किम इन योंग यांनी दिली. इतर कोणत्या देशाविरोधात अणू आक्रमण करण्याचा अथवा धमकी देण्याचा आमचा प्रयत्न नाही, असेही ते म्हणाले.
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही ! – चीन
जर कोरियाच्या द्विपकल्पात युद्ध झाले, तर कोणीही जिंकणार नाही, असे विधान चीनने केले आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेने युद्धाची घोषणा केली असून उत्तर कोरिया या युद्धाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे, असे म्हटले होते. त्यानंतर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव साराह सेंडर्स यांनीही नवे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अमेरिकेने कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत, असे यात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात