- वाढदिवस स्मशानात साजरा केल्याने अंधश्रद्धा दूर होते, अशी अंधश्रद्धा ठेवणारे आताचे सुशिक्षित तरुण !
- जे पंचज्ञानेंद्रियांनी लक्षात येते, तेवढेच सत्य असे शिक्षण देण्यात येत असल्यानेच हिंदूंची आध्यात्मिक स्तरावर अशी स्थिती झाली आहे, ही हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !
- हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कर्णावती : येथील जमालपूरच्या सपतर्ही मुक्तीधाम स्मशानात १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काही युवकांनी त्यांच्या एका मित्राचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. मृतदेह स्मशानात ज्या जागेवर ठेवला जातो तिथे त्यांनी केक ठेवून त्यावर मेणबत्त्या पेटवल्या होत्या. राकेशने केक कापल्यानंतर त्याचे मित्र तोच केक परस्परांच्या तोंडवळ्यावर फासत होते.
वाढदिवस असलेला युवक म्हणाला की, माझ्या मित्रांनी स्मशानामध्ये वाढदिवस साजरा करायचे ठरवले. स्मशानाविषयी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत. त्या दूर होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. त्यासाठी स्मशानात वाढदिवसाची कल्पना मला आवडली. माझा वाढदिवस फक्त कार्यक्रम नव्हता, तर अंधश्रध्दांविरोधात तो एक संदेश होता. समाजात चांगले शिकलेले लोकही अंधश्रद्धांना खतपाणी घालतात.
या युवकांपैकी एका स्थापत्य अभियंत्याने स्मशानात वाढदिवसाची कल्पना मांडली. त्याने मागच्या वर्षी एका मित्राचा वाढदिवस स्मशानामध्ये साजरा केला होता. लोक स्वत:च्या आनंदासाठी घरी, कार्यालयात वाढदिवस साजरा करतात; पण आमच्या या कार्यक्रमामधून समाजाला एक संदेश जावा, यासाठी आम्ही स्मशानभूमीची निवड केली, असे त्याने सांगितले.
(संदर्भ : लोकमत संकेतस्थळ)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात