बांगलादेशातील हिंदूंवर वाढत असलेल्या आक्रमणांचे आणखी एक उदाहरण !
तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून हिंदूंवरील आक्रमणे पाहू न शकणार्या प्रसारमाध्यमांचा निषेध करावा तितका थोडाच !
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात श्री राधानाथ मंदिर नावाचे श्रीकृष्णाचे ३०० वर्षे प्राचीन मंदिर आहे. चट्टोपाध्याय या हिंदु कुटुंबाच्या मालकीचे असलेले हे मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू यांची नुकतीच चोरी झाली. या मंदिरातील चोरीची ही घटना काही नवीन नाही.
१. वर्ष १९९४ मध्ये या मंदिरातील श्रीकृष्णाची ३०० वर्षे जुनी मूर्ती चोरण्यात आली होती. याविषयी चट्टोपाध्याय कुटुंबाने तक्रार करूनही आणि मूर्ती परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करूनदेखील काही उपयोग झाला नाही.
२. त्यानंतर या कुटुंबाने त्याच प्रकारची दुसरी मूर्ती बनवून तिची स्थापना केली. वर्ष २००४ मध्ये ती मूर्तीही चोरीला गेली.
३. २००५ मध्ये नवीन मूर्तीची परत स्थापना करण्यात आली. जून २०१५मध्ये मंदिरातील लोखंडी तावदाने तोडून चोरांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील सुवर्ण आणि चांदीचे अलंकार चोरून नेले.
४. जुलै २०१५ मध्ये चोरांनी पुन्हा लोखंडी गज तोडून या कटुंबाच्या निवासस्थानामध्ये प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तू आणि दोन दुचाकी पळवल्या.
५. चट्टोपाध्याय कुटुंबातील द्वीपेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या अन्यायाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून ९ फेब्रुवारीला बांगलादेश शासन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एक पत्र लिहिले.
६. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या घटनांमागे कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र आहे. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
७. या छळाला कंटाळून त्यांनी घर सोडून जावे आणि त्यांची मालमत्ता हडप करणे शक्य व्हावे, यासाठी त्यांची छळवणूक केली जात आहे, असेही द्वीपेंद्रनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
८. या कटाच्या मागे स्थानिक राजकीय पुढार्यांचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
९. या प्रकरणी सदर कुटुंबियांनी स्थानिक खासदार जुल्लुल हकीम आणि पंतप्रधानांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात