नवी देहली : पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टीस्थान येथे तेथील नागरिकांनी २२ ऑक्टोबरला पाकच्या विरोधात आंदोलन केले. पाक सरकार आणि पाकचे सैन्य यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. २२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पाकच्या सैन्याने कबाली लोकांच्या वेशात येथे घुसखोरी करून हा भाग कह्यात घेतला होता. त्यामुळे या नागरिकांनी हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला.
पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद, रावलकोट, कोटली, गिलगिट, हजीरा आणि अन्य काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. रावळकोटच्या जवळील बानबेहक येथे एक मोठा मोर्चा काढून तेथे सभा घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी पाकविरोधात घोषणा दिल्या आणि तेथून पाकच्या सैन्याने त्वरित निघून जावे, अशी मागणी केली.
कोटली आणि हजीरा येथेही मोर्चा काढण्यात आला. तसेच मुझफ्फराबादच्या नीलम पुलावर आंदोलन करण्यात आले. येथील जम्मू-काश्मीर नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ता नबील मुगल यांनी सांगितले की, आम्ही अनेक सूत्रांवर आंदोलन केले. नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प अवैधरित्या बनवण्यात येत आहे, त्याचाही विरोध केला. या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आम्ही विद्यार्थी संघटनांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्याचीही सरकारकडे मागणी केली. याव्यतिरिक्त अटकेत असणारे गिलगिट आणि बाल्टीस्थान यांच्या नेत्यांना त्वरित मुक्त करण्याचीही मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात