Menu Close

अंनिसचा ‘प्राथमिक शाळां’तील अनधिकृत ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ घेऊ नये ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ राबवत आहे. या प्रकल्पात घेण्यात येणारे भाषण आणि प्रश्‍नपत्रिका या माध्यमांतून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मनातील देव, धर्म अन् संस्कृती यांच्याविषयी असणारी श्रद्धा आणि विश्‍वास नष्ट करून त्यांना नास्तिक बनवण्याचे कारस्थान चालू आहे. अशा धर्मविरोधी प्रशिक्षणामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हा प्रकल्प चालू राहिल्यास भविष्यात समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तरी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या वतीने ‘प्राथमिक शाळां’तील शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी अनधिकृतरित्या घेण्यात येणारा ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ घेण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांनी स्वीकारले. श्री. शिंदे यांनी हे निवेदन शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवतो, तसेच जिल्ह्यात कुठेे असा प्रकार होत असल्यास निदर्शनास आणून द्या, असे सांगितले.

या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा पवार, शहराध्यक्षा रेखा दुधाणे, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, पतीत पावन संघटनेचे श्री. सुनील पाटील, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, ‘वंदे मातरम युथ ऑर्गनायझेशन’चे श्री. अवधूत भाट्ये, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री गोविंद देशपांडे, देवराज सहानी, जयकुमार खडके, सागर पाटील, रणजित जौंजाळ, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी उपस्थित होते.

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाविषयी कारवाई करून कळवू – उपजिल्हाधिकारी खेडकर

नाशिक येथेही उपजिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन

नाशिक : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. शशिधर जोशी यांनी नाशिकचे उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर आणि शिक्षणाधिकारी श्री. नितीन उपासनी यांना अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प थांबवण्याविषयी निवेदन दिले आहे. या वेळी उपजिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करून आपल्याला सूचित करू, असे आश्‍वासन दिले.

या वेळी श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेे. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अयोग्य संस्कार आणि त्यांना  चुकीचे दिशादर्शन केले जात आहेे. तरी याला जिल्हा प्रशासनाने आळा घालावा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *