राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची मागणी
सोलापूर : देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप असून त्यांना देशात थारा देण्यात येऊ नये, अशीच भूमिका सामान्यजनांचीही आहे. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे येत आहे. तरी भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे आणि भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना यापुढे भारतात प्रवेश देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी केली. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हापरिषद मुख्य प्रवेशद्वाराजवळ या वेळेत करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त त्या बोलत होत्या. या वेळी ‘रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा’, अशा अनेक घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. यशपाल वाडकर यांनी केले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधीकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी अन्य मान्यवरांनीदेखिल मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री. विठ्ठल नोरा, विलास पोतु, रणधीर स्वामी, मल्लीकार्जुन माने, रमेश आवार यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शासन करा ! – सौ. अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा
सिंहगडाच्या दुरुस्तीच्या कामात १ कोटी ३९ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे हिंदू विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड केले आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणार्या किल्ल्यांच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सौ. अलका व्हनमारे यांनी या वेळी केली.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या..
१. ज्या ज्या संघटना, व्यक्ती अथवा धार्मिक नेते रोहिंग्यांची बाजू घेत आहेत, अशा जातीय तणाव निर्माण करणार्या भारतीय मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये.
२. म्यानमारमधील हिंसाचारामुळे निवार्सित रोहिंग्या हिंदूंच्या संदर्भात भारत सरकारने भूमिका घोषित करून रोहिंग्या हिंदूंच्या सुरक्षिततेचे गंभीर सूत्र जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्र संघा’मध्ये उपस्थित करावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात