गोमांस विक्रेत्यांनी घेतली मंत्री विजय सरदेसाई यांची भेट
पणजी : गोव्यात गोमांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी परराज्यातून हत्येसाठी आणण्यात येत असलेल्या गोवंशाची वाहतूक करणारे ट्रक प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य अडवत आहेत. बेळगावी येथूनही गोवंश येणे बंद झाला आहे. यामुळे गोव्यात गोमांसाचा तीव्र तुटवडा भासणार आहे. उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला पाहिजे, अशी मागणी गोव्यातील गोमांस विक्रेत्यांनी केली आहे. या अनुषंगाने गोमांस विक्रेत्यांनी नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांची मागणी मांडली आहे.
गोमांस विक्रेत्यांच्या मते प्राणी कल्याण मंडळाच्या सदस्यांकडून गोमांस विक्रेत्यांची सतावणूक होत आहे. (गोवंश वाहतूक अवैधरित्या होत असल्यानेच प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य ती अडवतात. स्वतः कायद्याचे पालन करायचे नाही आणि सतावणूक होत असल्याचा कांगावा करायचा, हे नाटक गोमांस विक्रेत्यांना चांगले जमते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) गोवंश शेतीच्या कामासाठी उपयुक्त नसतांनाही, तसेच त्याचे वय झालेले असतांनाही संबंधित गोवंश आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे आणि शेतीसाठी उपयोगी आहे, असे सांगून मंडळाचे सदस्य हा गोवंश केपे येथील गोशाळेत पाठवत आहेत. (गोवंशाचे लाभ गोमांस खाणार्यांना कसे कळणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आतापर्यंत सुमारे १० गोवंश या गोशाळेत पाठवण्यात आला आहे.
गोव्यात कर्नाटक येथून गोमांसाचा पुरवठा होत असून तेथेही हीच समस्या आहे. यामुळे गोव्यात गोमांसाचा तीव्र तुटवडा भासणार आहे. शासनाचा उसगाव येथे मांस प्रकल्प असून यामध्ये १५० गोवंशाची हत्या करण्याची क्षमता आहे; मात्र या ठिकाणी गोवंशाची हत्या केली जात नाही. गोवा मांस प्रकल्पाच्या अधिकार्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, गोवा मांस प्रकल्प कार्यान्वित करायचा असेल, तर प्रथम बेळगावी येथून गोव्यात गोवंश सुरक्षितरित्या आणण्याची सोय करावी लागेल. विविध प्राणीप्रेमी संघटनांकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात असल्याने गोवा मांस प्रकल्पाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
गोवंशाची वाहतूक करतांना नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडू ! – गोवंश रक्षा अभियान
प्राणी कल्याण मंडळ आणि उच्च न्यायालय यांनी गोवंशाची वाहतूक करण्यासंदर्भात निकष आणि नियम घालून दिलेले आहेत. गोवंशाची वाहतूक करणारे या नियमांचे पालन करत नाहीत. गोवंशाची वाहतूक करणार्यांनी या नियमांचे प्रथम पालन करावे. नियमांचे उल्लंघन केले जात असेल, तर गोवा गोवंश रक्षा अभियान याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल. मंत्री महोदयांनी गोमांस विक्रेत्यांची बाजू समजून घेण्याअगोदर गोमांसाच्या वाहतुकीला अनुसरून असलेले नियम वाचावेत आणि गोवंशाचे रक्षण करावे अन्यथा गोवंश रक्षा अभियान या लोकप्रतिनिधींच्या विरोधात या विषयावर जनजागृती करेल. शासनाने महाराष्ट्र्राच्या धर्तीवर गोव्यातही गोवंश हत्या बंदी कायदा आणावा, अशी मागणी गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात