मुंबई : राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये; म्हणून पद्मावती चित्रपट हिंदुत्वनिष्ठांना दाखवल्याशिवाय राज्यात प्रदर्शित होणार नाही, असे आश्वासन गृहराज्यमंत्री श्री. रणजीत पाटील यांनी राजपूत महामोर्चा या संघटनेला दिले. वादग्रस्त पद्मावती चित्रपटाच्या संदर्भातील वाढता असंतोष लक्षात घेता २५ ऑक्टोबरला राजपूत महामोर्चा या संघटनेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री श्री. पाटील यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत महामोर्च्याचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर उपस्थित होते.
या वेळी श्री. पाटील म्हणाले, चित्रपटात राणी पद्मावती यांच्याविषयी काही चुकीचे चित्रण असेल, तर ते काढून टाकण्यास सांगू. मगच चित्रपट प्रदर्शित करण्यास सांगू.
या वेळी श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, राणी पद्मावतीला दुष्ट मोगल खिलजी याची प्रेमिका दाखवली असल्याचे समजले आहे. इतिहासात असा कुठेच उल्लेख नाही. खिलजीच्या हातात जिवंत लागू नये, यासाठी राणी पद्मावतीने ३६ सहस्र राजपूत स्त्रियांसह जोहार केला होता. त्यामुळे राणी पद्मावतीला खिलजीची प्रेमिका दाखवले असल्यास तो हिंदूंचा अवमान होईल. असे झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. देशात खिलजी, औरंगजेब, टीपू सुलतान या हिंदूंच्या हत्यारांचा उदोउदो होणे राष्ट्रासाठी घातक आहे. हिंदु धर्म नष्ट करून इस्लामीकरण करण्याचा हा डाव आहे. व्होट आणि नोट यांकरिता कार्य न करता हिंदु धर्माच्या रक्षणाचे कार्य सरकारने करावे; कारण आम्ही हिंदु म्हणून मोदी यांना मते दिली. हिंदु धर्माचे रक्षण करत नसाल, तर सत्ता सोडा.
श्री. सेंगर यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशीही या संदर्भात भ्रमणभाषवरून चर्चा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात