नवी देहली – हिंदूंच्या पवित्र १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरातील शिवलिंगावर केवळ अर्धा लिटर आर्.ओ. पाण्याने (प्रक्रियेने शुद्ध केलेल्या पाण्याने) अभिषेक करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याशिवाय दूध किंवा पंचामृताद्वारे अभिषेक करण्यासाठीही सव्वा लिटरचे प्रमाण निश्चित केले आहे. यासह संध्याकाळी अभिषेक पूर्ण झाल्यानंतर ५ वाजता शिवलिंगाची स्वच्छता करून ते कोरडे केले जाईल. त्यानंतर मात्र जलाभिषेक न करता केवळ कोरडी पूजाच केली जाणार आहे.
उज्जैन येथील सारिका गुरु यांनी याचिका प्रविष्ट करून येथील शिवलिंगाची झीज होण्याविषयीचे सूत्र उपस्थित केले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने एका तज्ञांच्या समितीची स्थापना केली होती. या समितीने पडताळणीअंती पंंचामृत, तसेच फुल, हार यांमुळेही शिवलिंगाची झीज होत असल्याचे सांगितले. याशिवाय पूजेत रासायनिक पावडरच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, लोखंडाऐवजी प्लाास्टिकच्या बादल्यांचा वापर केला जावा, तसेच गर्भगृहात अल्प संख्येने भाविकांना प्रवेश द्यावा, अशा शिफारसी समितीने त्यांच्या अहवालात केल्या होत्या. याविषयी याचिकाकर्त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू आणि सूचना मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. या प्रकरणी आता ३० नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.