राष्ट्रप्रेमी संघटनांच्या प्रयत्नांना यश
राष्ट्रप्रेमी नागरिकांनो, या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मडगाव : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा रविवार, २९ ऑक्टोबर या दिवशी मडगाव येथे आयोजित केलेल्या महामेळाव्याला उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी अनुज्ञप्ती नाकारली आहे. या संघटनेचा आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने अनुज्ञप्ती नाकारली आहे. या महामेळाव्याला गोव्यातील राष्ट्रप्रेमी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तसेच शांतताप्रिय जनतेतूनही महामेळावा रहित करण्याची वाढती मागणी होती.
मडगाव पोलिसांनी या महामेळाव्यात धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या कारणास्तव महामेळाव्याला अनुज्ञप्ती देऊ नये, असा अहवाल उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मडगाव नगरपालिका कार्यालय यांना दिला होता. पोलिसांच्या अहवालावरून मडगाव नगरपालिकेने महामेळाव्यास दिलेला ना हरकत दाखला मागे घेतल्यामुळे आणि पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्याने उपजिल्हाधिकार्यांनी महामेळाव्याला अनुज्ञप्ती नाकारली. (मडगाव नगरपालिकेला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची आतंकवादी पार्श्वभूमी ठाऊक नाही का ? पालिकेने ना हरकत दाखला दिलाच कसा ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांच्या मते, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा आतंकवादाशी संबंध असून या संघटनेवर केंद्रशासनाने बंदी घालावी का ? या विषयावर राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर चर्चा चालू आहे. या संघटनेची चर्चा राष्ट्रीय पातळीवर चाललेली असतांना या संघटनेला मडगाव शहरात खुल्या जागेवर महामेळावा घेण्यास अनुज्ञप्ती देणे योग्य होणार नाही. या महामेळाव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार महामेळाव्याला पोलिसांनी अनुज्ञप्ती नाकारल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांनी मडगावचे पोलीस निरीक्षक सी.एल्. पाटील यांची भेट घेऊन त्यांना महामेळाव्यात कोणत्याच प्रकारची तेढ निर्माण होणार नाही याची हमी दिली; मात्र पोलिसांनी अहवालात पालट न करण्याचे संकेत आयोजकांना दिले.
मडगाव नगरपालिकेने महामेळाव्याचे फलक हटवले
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने महामेळाव्याच्या प्रसिद्धीच्या अनुषंगाने मडगाव शहरात लावलेले फलक मडगाव नगरपालिकेने हटवले आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा ज्या ठिकाणी महामेळावा होणार होता, त्या लोहिया मैदानात पोलीस नेमण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात