पुणे : वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले. हे त्यांचे पहिले नव्हे, तर गेल्या ७०० वर्षांपासूनचे सातवे पलायन आहे. मग १९९० मधील पलायन वेगळे का ? कारण त्या वेळी भारत स्वतंत्र झाला होता आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. इस्लामी आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये आक्रमण करून त्याचा प्रतिसाद पहायचा होता. जेव्हा पहिल्यांदा मंदिरे पाडली गेली, हिंदूंचे बळी घेतले गेले, तेव्हा संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया आली असती, तर आतंकवाद्यांचे पुढे काही करण्याचे धाडस झाले नसते. काश्मीर ही माझी पितृभू आणि पुण्यभू दोन्हीही आहे; पण आज मी तिथे जाऊ शकत नाही. तिथे मला सुरक्षित वाटत नाही. आम्ही जर परत जाऊ, तर आमच्या अटींवर; कारण हा प्रश्न राजकीय नसून धार्मिक आहे, असे प्रतिपादन ‘पनून कश्मीर’ संघटनेचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे शहर मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी बोलत होते. या वेळी सावरकर साहित्याचे अभ्यासक श्री. अक्षय जोग यांनीही ‘सावरकरांचे हिंदुत्व’ याविषयी आपले विचार मांडले.
श्री. राहुल कौल पुढे म्हणाले, ‘‘काश्मिरी नागरिक नव्हे, तर फक्त काश्मिरी हिंदू विस्थापित झाले आहेत, हे सूत्र येथे लक्षात घ्यावे लागेल आणि म्हणूनच काश्मिरी हिंदूंची ‘घरवापसी’ हे सूत्र नसून इस्लामी आतंकवाद संपवणे हे महत्त्वाचे आहे. त्याचा आरंभ काश्मीरपासूनच व्हायला हवा; कारण ती या देशाची खिडकी आहे. जोपर्यंत हे खिंडार बुजवले जात नाही, तोपर्यंत देशातील आतंकवाद थांबवणे अशक्य आहे.’’
कार्यक्रमाच्या आरंभी ‘वीर सावरकर’ ही चित्रफीत दाखवण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात