नवी मुंबई : गोपाष्टमीनिमित्त खारघर आणि बेलापूर येथील विविध संघटनांनी गोशाळांमध्ये जाऊन विधिवत पूजा-अर्चा केली आणि गोमातेचे आशीर्वाद घेतले.
खांदा वसाहत, पनवेल येथील आसुदगाव गोशाळेत, तर बेलापूर येथील अंबाजी गोशाळेत पूजा करण्यात आली. गोप्रेमींसाठी प्रसादरूप केशर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. खारघर मधील गोल्फ कोर्सच्या मागील गोशाळेत आणि सेक्टर-५ येथील आई माता मंदिरात गोपूजन झाले.
या कार्यक्रमात गोरक्षक श्री. संदीप शर्मा, त्यांच्या भगिनी सौ. विनिता नेगी, संदीप यांचा मुलगा कु. खुशांश शर्मा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या वेळी श्री. महिंद्र पवार आणि विश्व हिंदू परिषदेचे श्री. शैलेश खोतकर, श्री. कृष्णा बांदेकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री संतोष मांडोळे, आनंद शेलार, निलेश देशमुख उपस्थित होते.
गोरक्षणासाठी कार्य करणार्या २ तरुणींशी झालेली भेट !
आईमाता मंदिरात दोन बहिणी वडिलांसह भावपूर्णरित्या गोपूजन करत होत्या. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर आणि गोरक्षणाविषयी त्यांची तळमळ पाहून आम्ही त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य सांगितले. त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही तुमच्यासारख्यांनाच शोधत आहोत. आजचे नियोजन देवानेच घडवले. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअॅपच्या गटात जोडा. आम्ही गोमाता रक्षणाविषयी त्यावर चलचित्र टाकू. आम्ही गोरक्षणाचा विषय निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपतींपर्यंत नेला आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात