सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भाविकांचा मात्र विरोध
विरार : विरार (पूर्व) येथील जीवदानी चौकातील श्री साई मंदिरावर अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून कारवाई होणार आहे. या कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भाविक यांनी ३० ऑक्टोबरला सकाळी ४५ मिनिटे याच मंदिरासमोर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. ‘कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडायला देणार नाही. मंदिराच्या रक्षणासाठी प्रसंगी महापालिकेवर मोर्चा काढू’, अशी भूमिका भक्तांनी घेतली आहे.
हे मंदिर ३२ वर्षांपूर्वीचे असून मंदिराला भूमी मालकाने बक्षीसपत्राद्वारे भूमी दिली आहे. तत्कालीन विरार नगरपरिषदेकडून घरपट्टीही वसुल केली जाते. मंदिर मंडळाचा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवलेला स्वतंत्र सार्वजनिक न्यास आहे. हे मंदिर नियमानुसार आणि अधिकृत असल्याचे श्री साई मित्रमंडळाचे म्हणणे आहे.
आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्यालयावर घोषणा दिल्या अन् महापालिकेत संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने साहाय्यक आयुक्त, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यापुढे शिष्टमंडळाने म्हणणे मांडले. यावेळी, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई चालू आहे’, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
शहरातील असंख्य अनधिकृत बांधकामांवर कारवाई का नाही ! – भक्तांचा प्रश्न
‘शहरात असंख्य अनधिकृत इमारती-बांधकामे उभी असून ती महापालिकेला दिसत नाहीत. त्यावर कारवाई न करता १ मंदिर पाडण्यासाठी प्रयत्न केला जातो. पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीची शहरातील अनधिकृत कार्यालयेही पालिकेने तोडून दाखवावीत. हे साई मंदिर अधिकृत असून काहीही झाले, तरी मंदिराला हात लाऊ देणार नाही’, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
भाविकांनी केलेल्या रस्ता बंद आंदोलनात सहभागी भक्तांवर, ‘मनाई आदेशाचा भंग केला’, असा ठपका ठेवत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात