श्री अंबाबाई मंदिराच्या पुजार्यांचा पत्रकार परिषदेत आरोप
मंदिराचे व्यापारीकरण हे सरकारीकरणामुळे झाले आहे. त्यामुळे शासनकर्त्यांनी तात्काळ मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून भक्तांच्या हाती सोपवावीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेच श्री अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले असून या समितीची चौकशी करावी, अशी मागणी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या पुजार्यांनी २ नोव्हेंबरला येथे पत्रकार परिषदेत केला. या वेळी सर्वश्री गजानन मुनिश्वर, मकरंद मुनिश्वर, गजानन नारायण मुनिश्वर आदी उपस्थित होते.
या वेळी श्री. मुनिश्वर पुढे म्हणाले की,
१. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे श्री अंबाबाई मंदिरासह अदमासे ३ सहस्र देवस्थाने आहेत.
२. देवस्थान समितीकडे २० सहस्र एकर जमीन इनाम आहे. मंदिरांची पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रमांना लागणारी सामग्री आणि खर्च या इनामातून करणे अपेक्षित आहे.
३. शिवाय समितीला श्री अंबाबाई मंदिरातूनही आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे समितीने मिळणारे एकूण उत्पन्न आणि खर्चाचा तपशील घोषित करावा. त्यांनी प्रथम स्वत:चा कारभार पारदर्शी करावा. समितीनेच श्री अंबाबाई मंदिराचे व्यापारीकरण केले आहे.
४. वर्ष २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी मंदिर परिसरात २२ अतिक्रमणे असून, ती काढण्याचे आदेश दिले होते. त्याविषयी समितीने कोणतीच कारवाई केलेली नाही.
५. मूळ ३ घराण्यांतील ५४ कुटुंबांना पूजेचा हक्क आहे. त्यामुळे वर्षातील एक आठवडा एका कुटुंबाकडे पूजेचा हक्क येतो. या काळातील उत्पन्न अनुमाने अडीच लाख रुपये आहे. पूजेचा ठरवून दिलेला आठवडा संपल्यानंतर इतर कोणतेही उत्पन्न मिळत नाही.
६. करवीर निवासिनी ही आद्य महालक्ष्मी आहे. तिला काही भाविक अंबाबाई म्हणत असतील, तर आमचा विरोध नाही. ती विष्णुपत्नी लक्ष्मी नाही, तर आद्य महालक्ष्मी आहे, सर्वांची माता आहे. तिच्या हातात म्हाळूंग हे फळ आहे. शंकराची पत्नीही महालक्ष्मीत सामावलेली आहे. याविषयीचा वाद आम्ही कधीच निर्माण केला नाही.
७. शाहूकालीन कागदपत्रांमध्येही महालक्ष्मी असाच उल्लेख आहे. या वादाशी आमचा काहीही संबध नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात