हिंदु महासभेच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन
सोलापूर : भारताचे तुकडे करण्याची भाषा करणारा कन्हैय्या कुमार याची ७ नोव्हेंबर या दिवशी होणारी सभा रहित करावी, या मागणीचे निवेदन हिंदु महासभेच्या वतीने पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि महापालिकेतील सभागृह नेते सुरेश पाटील यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी होते.
सुरेश पाटील यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त ढाकणे यांना सभा रहित करावी, असे पत्र पाठवले. हे निवेदन हिंदु महासभेचे शहर उपाध्यक्ष श्री. सुधाकर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. यशपाल वाडकर, श्री. सत्यनारायण गुर्रम, महासभेचे सदस्य श्री. विजय यादव, श्री. मल्लिनाथ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रशियन राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याविषयी येथील पुंजाल मैदान येथे कन्हैय्या कुमार याच्या सभेचे आयोजन केले आहे. यापूर्वी कन्हैय्या कुमारने भारतीय सेनेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, तसेच संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल याला फाशी दिल्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याविषयी त्याने कारावासही भोगला आहे. त्यामुळे त्याच्या भाषणाने सोलापूर येेथील युवकांकडून देशविरोधी कृत्य होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही सभा रहित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंदुत्वनिष्ठांची भूमिका ऐेकल्यावर पोलीस आयुक्त तांबडे म्हणाले, प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. अद्याप सभेला अनुमती दिलेली नाही; पण अनुमती देण्यापूर्वी तुमच्या निवेदनाचा अवश्य विचार करू.
निवेदन दिल्यावर महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले, सभेला दिलेली अनुमती रहित करू शकत नाही. पोलिसांनी आम्हाला कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवसेनेचे श्री. प्रताप चव्हाण यांचाही सभेला विरोध असून सभा रहित करण्याविषयीचे पत्र पोलीस आयुक्तांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात