हिंदु जनजागृती समितीची हुब्बळी (कर्नाटक) येथे जनसंवाद सभा
हुब्बळी (कर्नाटक) : हिंदूंचा धार्मिक पाया मजबूत करणे, हा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा मुख्य उद्देश आहे. असे असतांना त्यांना खोट्या प्रकरणांत गोवले जात आहे. साम्यवाद्यांच्या हत्यांचे निष्पक्षपणे अन्वेषण होणे आवश्यक असतांना तसे न करता हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर खोटे आरोप केले जाणे निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शिव-कृष्ण मंदिरातील सभागृहात ४ नोव्हेंबर या दिवशी ‘जनसंवाद सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अधिवक्ता चेतन मणेरीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे योग्य दिशेने अन्वेषण होणे आवश्यक ! – अधिवक्ता चेतन मणेरीकर
अधिवक्ता चेतन मणेरीकर म्हणाले, ‘‘हिंदुत्व नामशेष करण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या हत्या केल्या जात आहेत. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारच्या कारकीर्दीत रुद्रेश, प्रशांत पुजारी आणि शरद मडिवाल या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या. त्याविरुद्ध कुणीही आवाज उठवला नाही. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांमध्ये ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे; मात्र त्या दिशेने अन्वेषण केले जात नाही.’’
साम्यवाद्यांच्या हत्येत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. गुरुप्रसाद गौडा
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी म्हणाले, ‘‘निधर्मी आणि साम्यवादी नेते विचारवंताच्या हत्यांचे खापर हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर फोडत आहेत. याप्रकरणी तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.’’
या सभेचा आरंभ शंखनादाने करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे धारवाड जिल्ह्याचे समन्वयक श्री. व्यंकटरमण नाईक यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला १८० जण उपस्थित होते. यामध्ये १५ अधिवक्ता आणि ३ हिंदु संघटना यांचा सहभाग होता. या वेळी ६ पत्रकार आणि २ वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात