गोतस्करांना मारहाण केल्याच्या कथित आरोपांवरून गोरक्षकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस हे गोरक्षकांवरील अशा प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात काय कारवाई करणार आहेत ? गोरक्षणासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
ठाणे, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – गोरक्षक श्री. यतींद्र जैन यांच्यावर कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले; मात्र सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. श्री. यतींद्र जैन यांनी एक आठवड्यात तीन ठिकाणी धाडी टाकून ३३ टन अवैध गोमांस पकडून दिले होते. त्याचा सूड उगवण्यासाठी काठ्या, सळ्या, चॉपर, तलवारी आणि देशी पिस्तुल यांसह चारचाकीतून आलेल्या कसायांनी दुचाकीवरील श्री. जैन यांचा पाठलाग केला अन् त्यांच्यावर मागून आक्रमण केले. यातून श्री. जैन थोडक्यात बचावले. (कसायांना कायद्याचा धाक नसल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही कसाई शिरजोर झाले आहेत. यासाठी शासनकर्त्यांनी कायद्याचे परिणामकारक कार्यवाही करणे आवश्यक आहे ! – संपादक)
१. संगमनेर ते भिवंडी या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होते. या पट्ट्यामध्ये अनेक पोलीस ठाणी आहेत. कसाई आणि पोलीस यांच्यामध्ये साटेलोटे असल्यामुळे अवैधपणे गोमांस वाहून नेणारी वाहने या पट्ट्यात अडवली जात नाहीत.
२. पोलीस आणि कसाई यांच्यातील संवादाचे ध्वनीमुद्रणही श्री. जैन यांना मिळाले आहे. त्यामुळे संतापलेल्या कसायांनी त्यांच्यावर आक्रमण केल्याचे म्हटले जात आहे. (ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाचे दायित्व आहे, असे पोलीसच कायदा पायदळी तुडवणार्यांना साहाय्य करत आहेत. अशा पोलिसांवरही कठोर कारवाई करण्यासाठी गोप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंनी पाठपुरावा करावा. – संपादक)
३. या आक्रमणाच्या निषेधार्थ श्री. जैन आणि त्यांचे सहकारी ६ नोव्हेंबरला ठाणे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. या गोमांसाची अवैध वाहतूक करण्यास साहाय्य करणार्या पोलिसांना निलंबित करावे, कसायांवर कठोर कारवाई करण्यात यावी, श्री. यतींद्र जैन यांच्यासारख्या गोरक्षकांना २४ घंटे पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी कायद्याचे पालन करावे इत्यादी मागण्या या भेटीत करण्यात येणार आहेत. (अशा मागण्या कराव्या लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात