आज नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन !
नाशिक, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या निषेधार्थ ८ नोव्हेंबरला नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले आहे. या संदर्भात विनयनगर येथील पंचमुखी हनुमान मंदिरात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये साधू-महंत, स्थानिक आमदार, ८ ते १० नगरसेवक, मंडळांचे प्रतीनिधी, मंदिराचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते आदी १५० जण उपस्थित होते.
‘हिंदुत्वनिष्ठ सरकार आम्ही निवडून दिले आहे, तरी हिंदूंची मंदिरे पडली जात आहेत आणि मशिदींवर कारवाई केली जात नाही’, असे मत या बैठकीत मांडण्यात आले. बैठकीत फेरसर्वेक्षण आणि एक कृती समिती स्थापन करण्याचीही सूचना करण्यात आली.
६ नोव्हेंबरला महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चुकीच्या सर्वेक्षणावर केल्या जाणार्या कारवाईला आक्षेप घेतला होता. या वेळी महापौरांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात