Menu Close

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकून १ सहस्र कोटी रुपयांची भांडवली रक्कम उभारण्यात येणार !

मंदिराच्या ६० सहस्र एकर भूमीचा हिशोबच सापडत नाही !

भुवनेश्‍वर – ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या देखभालीसाठी निधीची अडचण भासल्याने मंदिराची ३९५ एकर भूमी विकून अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांचा भांडवली निधी उभा करायचा आणि त्याच्या व्याजावर मंदिराचा व्यय चालवायचा घाट मंदिर व्यवस्थापनाने घातला आहे. (प्रसिद्ध मंदिराची भूमी विक्रीला काढणे म्हणजे मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, अशी हिंदु भाविकांची भावना असल्याचे म्हटले जात आहे; म्हणून राज्यशासनाने मध्यस्थी करून समस्या सोडवली पाहिजे, असे भाविकांना वाटते ! – संपादक) 

१. श्री जगन्नाथ मंदिराला भाविकांनी एकूण ६० सहस्र ६५४ एकर भूमी दान दिली आहे. त्यातील ६० सहस्र २५९ एकर भूमी ओडिशा राज्यातील २३ जिल्ह्यांत पसरली आहे, तर उर्वरित ३९५ एकर भूमी बिहार, बंगाल, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यांत आहे. त्यापैकी ३२२ एकर भूमी एकट्या बंगालमध्ये आहे.

२. ओडिशा वगळता इतर राज्यांतील संपूर्ण भूमी विकण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे प्रमुख श्री. सुरेश महापात्रा यांनी दिली आहे. त्यासोबतच उत्तराखंडमधील नैनिताल येथे एका भाविकाने दान केलेली एक इमारतही विकण्याचे ठरवले आहे; मात्र या इमारतीचे मालकीपत्र शासनाकडे उपलब्ध नाही.

३. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या नावे असलेल्या ओडिशा राज्यातील एकूण ६० सहस्र २५९ एकर भूमीपैकी २७ सहस्र ३३१ एकर भूमीची मालकी दाखवणारी कागदपत्रे अथवा भाडेपट्टी राज्यशासनाकडे उपलब्ध नाही. केवळ ३२ सहस्र ९२७ एकर भूमीची मालकी दाखवणारी कागदपत्रे सापडली आहे.

सर्व भूमीवर अतिक्रमणे झाली आहेत. (देवस्थानच्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत सरकार काय करत होते ? ही अतिक्रमणे करणार्‍यांसह ती होऊ देणार्‍या प्रशासनातील उत्तरदायींवर कारवाई करा ! – संपादक) त्यासाठी न्यायालयात ३४० खटले प्रलंबित आहेत.

४. यासोबतच मंदिराकडे असलेल्या १२५ एकर निवासी भूमीची विक्री करून निधी उभारण्याचे ठरवले आहे; मात्र या जागेवर अनेक वर्षापासून रहात असलेल्या ग्रामस्थांनी उच्च न्यायालयाकडून या आदेशाविरुद्ध स्थगिती आणली आहे. मंदिर प्रशासन ही स्थगिती उठवण्याच्या प्रयत्नात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *