‘मुंबईच्या चिंचपोकळी येथे रहाणार्या मिशाख नेव्हीस या १७ वर्षीय तरुणाचा कर्करोगाने २७ ऑक्टोबरला मृत्यू झाला. ‘मुलगा जिवंत होईल’, या आशेने नागपाड्यातील ‘जिजस फॉर ऑल नेशन्स चर्च’चे बिशप आणि त्याचे वडील ऑक्टोविमो जोसेफ यांनी मिशाखचा मृतदेह १० दिवस या चर्चमध्ये ठेवून प्रार्थना केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर त्याचे दफन करण्यात आले. या घटनेचा बराच गाजावाजा झाला; मात्र ‘पुरोगामी महाराष्ट्रा’तून अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यास निघालेल्या अंनिसवाल्यांपर्यंत हे वृत्त बहुदा पोहोचले नसावे !
हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये नाक खुपसून त्यांना फुकाचे सल्ले देणारे अंनिसवाले अन्य धर्मीय अशा अघोरी कृती करत असतांना मात्र कुठल्या बिळात लपून बसतात, हे तेच जाणोत ! अंनिसवाल्यांचे ख्रिस्तीप्रेम हे काही नवे नाही. मध्यंतरी एक ख्रिस्ती पाद्री ‘सर्वगुणसंपन्न’ तेल विकत होेता. ‘या तेलामुळे सर्व रोग बरे होतात’, असा प्रचार-प्रसार तो करू लागला. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हस्तक्षेप करून ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती. या घटनेचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली; मात्र अंनिसवाल्यांपर्यंत हे वृत्त पोहोचलेच नाही !
‘आम्ही सर्व धर्मांतील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचा वसा घेतला आहे’, असे अंनिसवाले सांगतात; मात्र त्यांच्या उक्तीत आणि कृतीत कमालीचा भेद आहे, हे यातून स्पष्ट होते. एवढेच काय चमत्काराचे वावगे असणार्या अंनिवाल्यांना मदर तेरेसा यांनी केलेले चमत्कार चालतात. त्यांना संतपद बहाल करतांना अंनिसवाल्यांनी विरोध केला नाही. या सर्व घटनांतून अंनिसवाल्यांची हिंदुद्वेेषी मनोवृत्ती उघड होते. अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणार्या अंनिसवाल्यांना म्हणूनच हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात