कुआलालंपूर – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारे डॉ. झाकीर नाईक यांना कह्यात घेण्यासाठी भारताने ‘म्युच्युअल लिगल असिस्टन्स’ कराराअंतर्गत औपचारिकरित्या मागणी केल्यास त्याला आम्ही भारताच्या कह्यात देऊ, असे मलेशियाने घोषित केले आहे; मात्र आतापर्यंत भारताकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन आलेले नाही. डॉ. झाकीर यांनी आमच्या देशात कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे त्यांना दिलेले नागरिकत्व आम्ही कायम ठेवणार आहोत, असे मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झाहीद हामिदी यांनी संसदेत सांगितले. काही दिवसांपूर्वीच डॉ. झाकीर यांना मलेशिया सरकारने त्यांच्या देशात कायमस्वरूपी रहाण्यास अनुमती दिली होती.
डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने नोंद घेतल्यानंतर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या साहाय्याने डॉ. झाकीर यांना आमच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारला रितसर विनंती करणार आहोत, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात