• सहस्रो पोलीस तैनात
• १ सहस्र लोकांना कह्यात घेतले
अशा प्रकारे कर्नाटकातील काँग्रेस सरकारने टिपू सुलतानच्या वंशजाचीच भूमिका बजावली आहे, हे वेगळे सांगायला नको !
बेंगळुरू – १० नोव्हेंबर या दिवशी कर्नाटक सरकारने सहस्रो पोलिसांचा फौजफाटा राज्यात तैनात करून आणि १ सहस्र लोकांना कह्यात घेऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी केली. तरीही काही ठिकाणी याला विरोध करण्यात आला. सकाळी जमावाने मडिकेरीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसवर दगडफेक केली. तसेच हुब्बळ्ळी आणि कोडागू येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी १०० कार्यकर्त्यांना अटक केली. जयंतीला विरोध करतांना हिंसाचार होऊ नये; म्हणून पोलिसांनी राज्यात कडेकोड सुरक्षाव्यवस्था केली होती.
बेंगळुरूचे पोलीस आयुक्त टी. सुनील कुमार यांनी सांगितले की, शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलली होती. त्यासाठी शहरात ११ सहस्र पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरातील विविध भागांत केंद्रीय सुरक्षा दलाच्या २० आणि कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या ३० तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. हिंसेची शक्यता असणार्या १० जिल्ह्यांत यातील बहुतेक पोलीस तैनात करण्यात आले होते. कोडागू, मंगळुरू, म्हैसुरू आणि बेंगळुरू शहरासह इतर जिल्ह्यांत हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) कमल पंत यांनी सांगितले की, ५ जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विविध ठिकाणांवरून १ सहस्र लोकांना कह्यात घेतले होते. यातील काही जणांना चेतावणी देऊन सोडून देण्यात आले होते. उर्वरितांना सायंकाळी सोडण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात