इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या ‘पद्मावती’ चित्रपटासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धी पत्रक
प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन महिला या समाजापुढे नाचगाणे करत नव्हत्या, तर त्या वीरांगना प्रसंगी हातात समशेर घेऊन मुघलांना नाचायला लावणार्या होत्या, असा इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. यापूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात त्यांनी बाजीरावांची पत्नी काशीबाई यांनाही नाचतांना दाखवले होते. हा हिंदु वीरांगनांचा अपमान असून, तो हिंदु समाज कधीही सहन करणार नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.
स्वतःच्या मनाप्रमाणे इतिहासाची मोडतोड करून मसालेदार चित्रपट बनवून त्यातून कोट्यवधी रूपये कमवणार्या दिग्दर्शकांना कलेचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लागू होत नाही. ‘घूमर’ हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्यप्रकार आहे आणि तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे. हा नाच कोणत्याही राजकन्या वा राण्या या करत नव्हत्या, हे इतिहासाच्या आधारे चित्रपट बनवणार्या भन्साळींना का माहिती नाही ? आजकाल बॉलीवूडमध्ये गुंड आणि राजकारणी यांच्यासमोरही ‘आयटम साँग’मध्ये नाच करण्यासाठी अन्य ‘आयटम गर्ल’ आणल्या जातात. मग येथे ‘घूमर’ नाचच दाखवायचा होता, तर भन्साळी तेथे अन्य कोणीही कलाकार नाचताना दाखवू शकले असते, तेथे राणी पद्मावतीला नाचतांना दाखवण्याचे प्रयोजन काय ? ज्या राणीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ (जिवंतपणी अग्नित प्रवेश) केला, अशा सत्शील राणीला नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. याबद्दल भन्साळी यांनी याविषयी हिंदु समाजाची जाहीर माफी मागावी आणि राणी पद्मावतीने नाच केलेले काल्पनिक गाणे चित्रपटातून वगळावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
संजय लीला भन्साळी यांना महिलांबद्दल, मातेबद्दल आदर आहे, म्हणून ते वडीलांच्या जागी आईचे नाव लावतात. तर मग राणी पद्मावतीकडे माता म्हणून पहाणार्या हिंदु समाजाच्या आदरयुक्त भावना त्यांना समजू नयेत, हे दुर्दैव आहे. वाद निर्माण करून गल्ला भरायचा, हा आता या निर्मात्यांचा धंदा झाला आहे, हेच यातून सिद्ध होते, असेही श्री. शिंदे म्हणाले.