मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानाला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
मडगाव : पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनद्वारे त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचीही माहिती द्या. त्याकाळी हिंदूंवर इन्क्विझिशन लादण्यात आले, याचा एकमेव पुरावा असलेला हात कातरो खांबही पर्यटकांना दाखवून त्याचा इतिहास पर्यटकांना सांगा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी भारताची वर्तमान स्थिती आणि ती पालटण्यासाठी समाजाचे योगदान, या विषयावर बोलतांना केले. पाजीफोंड, मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीने जिज्ञासूंसाठी आयोजित केलेल्या व्याख्यान्यात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचीही उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. मनोज सोलंकी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले,
१. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना ६ डिसेंबर हा दिवस बाबरीचा ढाचा ढासळला म्हणून काळा दिन पाळण्याचे आवाहन करणारी पत्रके गोव्यात ठिकठिकाणी लावते. बाबरी ढासळली म्हणून हिंदूंनी काळा दिवस का पाळायचा ? पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर स्वच्छ भारत अभियान राबवत असूनही गोव्यात वाळपई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी स्वच्छता करणार्या हिंदूंना सरकार ती करू देत नाही आणि ती स्वत:ही करत नाही. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचा हा प्रकार आहे. काश्मिरी मुसलमान गोव्यात दुकाने टाकून व्यवसाय करतात; मात्र उर्वरित भारतातील हिंदूंना काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे एकही दुकान खरेदी करता येत नाही किंवा नवीन कायद्यानुसार दुकान भाडेपट्टीवरही घेता येत नाही.
२. संजय लीला भन्साळी इतिहासाची मोडतोड करून पद्मावती चित्रपटात घूमर या गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवतात. त्याला राजपूत समाजाकडून विरोध झाल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा केल्या जातात. येशूची अपकीर्ती होते आणि ख्रिस्तींच्या भावना दुखावतात, म्हणून द दा विन्ची कोड या चित्रपटावर, तसेच मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात, म्हणून विश्वरूपम् या चित्रपटावर बंदी आणली जाते, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य लागू होत नाही का ?
३. चित्रपट, विज्ञापने, वस्तू आदी अनेक माध्यमांतून हिंदूंच्या परंपरा आणि संस्कृती यांना नष्ट करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. हिंदूंच्या मनात हिंदु धर्माविषयी कोणताही आदरभाव राहू नये, हिंदु धर्माविषयी त्यांच्या मनात घृणा निर्माण व्हावी, यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. हिंदूंना आज समान अधिकार, गोहत्या थांबवणे, धर्मपरिवर्तन थांबवणे यांसाठी लढावे लागत आहे. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे.
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी जीवनात साधना करण्याचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी जन्म मिळालेला आहे. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक आहे, असे सांगून साधनेचे महत्त्व त्यांनी या वेळी विषद केले. या व्याख्यानाला ६६ धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. व्याख्यानानंतर उपस्थित हिंदूंनी साधनेसंदर्भात माहिती जाणून घेतली.
२. व्याख्यानानंतर एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रत्येक १५ दिवसांनी जिज्ञासूंसाठी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात