जळगाव : भारतात भारतीय स्त्रियांच्या विटंबनेचा प्रकार सर्रास होत आहे. आपल्या शीलरक्षणासाठी १५ सहस्र स्त्रियांसह राणी पद्मावतीने जोहार करत अस्मिता जोपासली आहे. त्यांच्या पवित्र चारित्र्यास कलंकित करणार्या आणि स्त्रीशक्तीचा घोर अपमान करणार्या संजय भन्साळी यांना धडा शिकवण्यासाठी संपूर्ण भारतीय समाज आणि राजपूत संघटना सज्ज झाल्या असून जळगाव येथे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृह जाळण्याची गर्भित चेतावणी राजपूत संघटनांनी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी दिली.
राजपूत संघटनांच्या वतीने सांगण्यात आले की,
१. ‘राणी पद्मावती’ला या चित्रपटात नाचतांना दाखवणे लज्जास्पद असून अल्लाउद्दीन खिलजीसोबत राणी पद्मावतीची विकृत कल्पना पडद्यावर दाखवली जाणार आहे.
२. जोहारच्या अग्नीकुंडातील पवित्र राखेची शपथ घेऊन संपूर्ण हिंदु समाज अशा बॉलीवूडरूपी विकृतीला आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांना कवडीमोल समजणार्या दिग्दर्शकांना सहन करणार नाही.
३. ही सर्व सूत्रे लक्षात घेता चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचे दायित्व सर्वस्वी आपले राहील, अशी चेतावणी राजपूत संघटनांच्या वतीने शहरातील चित्रपटगृहाच्या मालकांना देण्यात आली.
या आंदोलनाला राजपूत सेनेचे शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे क्षत्रीय समाजाचे श्री. महेंद्रसिंह पाटील, भुसावळ येथील श्री. रमाकांत राजपूत, धरणगाव येथील श्री. प्रथमेशसिंह राजपूत, एरंडोल येथील श्री. सुनील राजपूत, दिपनगर येथील श्री. सागर राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात