अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी
नगर : ‘दशक्रिया’ चित्रपटातील अनेक दृष्य आणि संवाद ब्राह्मण समाज आणि पुरोहित यांची निंदा करणारे, तसेच समाजात जातीयवाद निर्माण करणारे आहेत. या चित्रपटात श्रद्धेने केल्या जाणार्या ‘श्राद्ध’ या विधीवर टीका करून अपशब्द वापरले असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी आणावी आणि निर्माते, दिग्दर्शक अन् संबंधितांवर जातीय तेढ निर्माण करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी त्वरित कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांचे निवेदन येथील ‘अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघा’ने जिल्हाधिकारी महाजन आणि पोलीस अधीक्षक शर्मा यांना दिले.
या वेळी ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यास संबंधित अधिकारी आणि सरकार उत्तरदायी असेल, असे संघटनेने स्पष्ट केले. या वेळी ‘अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. नरेंद्र कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, प्रदेश संघटक आबासाहेब एडके, शहराध्यक्ष वैभव जोशी, सौ. सुवर्णा महापुरुष, युवाध्यक्ष मंगेश निसळ यांसह १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी संबंधित अधिकार्यांनी ‘चित्रपटगृह आणि सेन्सॉर बोर्ड यांच्याशी चर्चा करू’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात