नागपूर येथील हिंदु धर्मजागृती सभा
नागपूर : भारताला हिंदु राष्ट्र्र घोषित करावे; कारण भारतात १०० कोटींहून अधिक हिंदू आहेत. असे असले, तरीही भारताला हिंदु राष्ट्र म्हणून का संबोधले जात नाही ? असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश मालोकार यांनी केले. काटोल तालुक्यातील श्री समर्थ स्वामी पुरुषोत्तम महाराज देवस्थान, येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले.
सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – सौ. मुलमुले, माजी नगरसेविका, काटोल
धर्मरक्षणाचे दायित्व आपलेच आहे; परंतु हिंदूंनाच हा विषय समजला नाही आणि ते याला महत्त्वही देत नाहीत. सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. धर्मशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे.
क्षणचित्र
धर्माभिमानी स्त्रियांनी समितीच्या पुढील कार्यक्रमांना इतर स्त्रियांनाही घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सहकार्य
१. श्री समर्थ स्वामी पुरुषोत्तम महाराज देवस्थान, काटोलचे विश्वस्त श्री. बाबासाहेब गाडगे यांनी देवस्थानचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२. श्री. दिलीप सुतोणे यांनी पटल, आसंद्या, पडदे हे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. धर्माभिमानी श्री. जितेंद्र तूपकर यांनी स्थानिक प्रसाराला साहाय्य केले.
४. सौ. जान्हवी देशमुख यांचा २५ महिलांचा गट आहे. त्यांनी ‘समितीद्वारे कार्यक्रम आयोजित करा, आम्ही गटातील महिलांव्यतिरिक्त इतर महिलांनाही एकत्रित करू’, असे सांगितले.
५. काटोल शहरातील धर्माभिमानी श्री. ओमप्रकाश जयस्वाल आणि त्यांच्या पत्नी सौ. अनिता जयस्वाल यांनी स्वतःहून साधकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात