Menu Close

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ दिल्यास परिस्थिती बिघडेल ! – उत्तरप्रदेश सरकारचे केंद्राला पत्र

उत्तरप्रदेशातील भाजपच्या सरकारला जे कळते ते केंद्रातील भाजपच्या सरकारला का कळत नाही ?

लक्ष्मणपुरी : राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तो प्रदर्शित होऊ देऊ नये, असे पत्र उत्तरप्रदेश सरकारने केंद्र सरकारला लिहिले आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांना पत्र लिहिले आहे. या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याने लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते, असा दावा यात करण्यात आला आहे.

या पत्रात पुढे लिहिले आहे की, अनेक संघटनांनी चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध केला आहे. त्यांनी चित्रपटगृहांमध्ये तोडफोड करण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयाला विनंती आहे की, त्यांनी यासंबंधी ‘सेन्सॉर बोर्डा’ला कळवावे जेणेकरून चित्रपटाला प्रमाणपत्र देतांना ‘सेन्सॉर बोर्डा’चे सदस्य जनतेच्या भावना लक्षात ठेवून निर्णय घेतील.

‘शूर्पणखेप्रमाणे तुझे नाक कापू !’ – अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना करणी सेनेची चेतावणी

जयपूर : ‘पद्मावती’ चित्रपत्रात राणी पद्मावतीची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला राजपूत करणी सेनेने चेतावणी दिली आहे. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिक तुझेही नाक कापू शकतात’, अशी चेतावणी करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दिली आहे. ‘काहीही झाले तरी ‘पद्मावती’ चित्रपट ठरलेल्या दिनांकालाच प्रदर्शित केला जाईल’, असे दीपिका पदुकोण यांनी म्हटले होते. त्यावर महिपाल यांनी ही धमकी दिली.

महिलांचा सन्मान करा ! – भाजपच्या केंद्रीयमंत्री उमा भारती

जेव्हा आपण राणी पद्मावतीच्या सन्मानाविषयी बोलतो, तेव्हा सर्व महिलांच्या सन्मानाकडे पाहायला हवे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी वरील चेतावणीवर व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मला विश्‍वास दिला गेला आहे की, ज्या गोष्टींचा विरोध होत आहे, त्याकडे सेन्सॉर बोर्ड लक्ष देणार आहे. मलाही विश्‍वास वाटतो की, ज्या काही शंका आणि अडचणी आहेत, त्याकडे बोर्ड लक्ष देईल. सेन्सॉर बोर्ड एक स्वतंत्र संस्था आहे. ते सर्वांच्या भावनांकडे लक्ष देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती देईल, अशी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, या चित्रपटात ज्यांनी अभिनय केला आहे, त्यांना विरोध केला जाऊ नये. कथेचे दायित्व दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे आहे.

संजय भन्साळी यांचे शिर कापणार्‍याला ५ कोटी रुपये देणार ! – राजपूत नेत्याची घोषणा

उत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने घोषणा केली आहे की, जी व्यक्ती संजय लीला भन्साळी यांचे शिर कापून आणेल, तिला ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *