लक्ष्मणपुरी : पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचे समोर आले असतांना आता ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्याचे कोणतेच औचित्य रहात नाही. न्यायालयाने पुरावे मागितले आणि ते हिंदूंच्या बाजूने होते. आता चर्चेची आवश्यकता काय आहे ?, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदु परिषदेने ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे श्री श्री रविशंकर यांच्याकडून याविषयावर मध्यस्थी करण्याच्या होत असलेल्या प्रयत्नावर व्यक्त केली.
१. विहिंपने म्हटले आहे की, श्री श्री रविशंकर देशातील सन्माननीय संत आहेत आणि आम्हीही त्यांचा मान राखतो; मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सामंजस्य घडवून आणण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाले आहेत. प्रत्यक्षात त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही.
२. विहिंपचे प्रांतीय माध्यम प्रभारी शरद शर्मा म्हणाले की, रामजन्मभूमी आंदोलनाशी कोणताही संबंध नसणारे सामंजस्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. रामजन्मभूमी हिंदूंची संपत्ती आहे. त्यामुळे इतरांसमोर हात पसरण्याची त्यांना आवश्यकता नाही.
३. रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य डॉ. रामविलास वेदांती यांनीही यापूर्वी श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी स्वीकारणार नाही, असे घोषित केले होते. ते कधीच या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत, असे वेदांती यांनी म्हटले होते.
श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीला विलंब झाला ! – योगी आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले ‘‘श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीला आता विलंब झाला आहे. त्यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये राममंदिराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि ५ डिसेंबरला दोन्ही पक्षकार त्यांची भूमिका मांडणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात