महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तांचा आदेश
पुणे : धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे. (राज्यातील अनेक महत्त्वाची मंदिरे शासनाने अधिग्रहीत केल्यावरही त्यामध्ये कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मंदिरांची नोंदणी करण्यासमवेत ती शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करत भक्तांच्या कह्यात देण्यासाठीही धर्मादाय आयुक्तांनी पावले उचलावीत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
राज्यातील सर्व धर्मादाय सहआयुक्त, उपायुक्त आणि साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना त्यांच्या क्षेत्रातील धार्मिक स्थळांची माहिती मागवण्यात आली आहे.
या संदर्भात श्री. डिगे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,
१. गावचे सरपंच, ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांच्याकडून धार्मिक स्थळांची माहिती मागवून त्यांची नोंदणी करून घ्यावी.
२. अनेक देवस्थाने आणि धार्मिक स्थळे यांच्याकडे भूमी आहे. दिवाबत्तीसाठी राजे-महाराजांनी देवस्थानला भूमी बक्षीस म्हणून दिली होती. अशा भूमीची नोंद देवस्थानच्या परिशिष्टावर करून घ्यावी. (पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांना भक्तांनी दान म्हणून दिलेल्या सहस्रो एकर भूमी गायब झाली होती. हिंदू विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन आंदोलन केल्यामुळे आता त्या जमिनीचा शोध लागला आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. धर्मादाय आयुक्तालयाच्या अनुमतीशिवाय देवस्थान भूमीची विक्री झाली असल्यास चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी.
४. अनेक पुजारी आणि विश्वस्त देवस्थानांचे उत्पन्न त्यांच्याकडे वळवतात. काही ठिकाणी पुजारीच विश्वस्त आहेत. देवस्थानांचे लाभार्थी देवस्थानचे विश्वस्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना विश्वस्तपदावरून हटवावे.
५. राज्यात अनुमाने ६५ सहस्र सर्वधर्मीय धार्मिक स्थळे असून त्यांपैकी अनेक देवस्थानांकडे देणगी आणि हुंडीच्या माध्यमातून भाविक मोठ्या प्रमाणावर संपत्ती अर्पण करतात. भक्तांच्या या अर्पणाचे नेमके काय होते, याचा लेखाजोखा नसतो. याचा अपवापर रोखण्यासाठी देवस्थानांच्या रचनेत योग्य ते पालट करावेत. (वक्फ बोर्डाच्या मालमत्ता तसेच चर्च संस्थांकडे असणार्या जमिनींविषयीही चौकशी होणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात