बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाचे प्रकरण
भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि त्याचे मंत्री या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न करतील का ?
ढाका : फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते. यात हिंदूंची ३० घरे जाळण्यात आली होती, तसेच त्यांचे मूल्यवान साहित्य लुटण्यात आले होते. या कथित ‘पोस्ट’ प्रकरणी अटक करण्यात आलेले टिटू रॉय यांच्या २ मुलींचे धर्मांधांनी अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. नुकतेच या पीडित हिंदूंच्या साहाय्यासाठी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली एका मानवाधिकार पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सत्यस्थिती जाणून घेतली. (भारतातील धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण झाल्यावर एकतरी पुरोगामी घटनास्थळी जाऊन त्यांचे दुःख आणि सत्यस्थिती जाणून घेतो का ? उलट अल्पसंख्यांकांवर चुकून ओरखडे जरी उमटले, तरी हेच पुरो(अधो)गामी त्यांच्यासाठी ऊर बडवू लागतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. धर्मांधांनी हिंदूंची २४ घरे पेटवली, तर १६ गायी आणि इतर मौल्यवान वस्तू पळवल्याचे मानवाधिकार पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
२. पोलिसांच्या अटकेत असलेल्या टिटू रॉय यांच्या दोन मुलींचे (एक १८ वर्षीय आणि दुसरी १३ वर्षीय) अपहरण केल्याचे या पथकाच्या लक्षात आले. या दोन्ही मुलींचे धर्मांतर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धर्मांधांच्या तावडीतून एका मुलीची सुटका करण्यास त्यांना यश आले; मात्र दुसरी मुलगी अजूनही धर्मांधांच्या तावडीत आहे.
३. अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी रंगपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महंमद मिझानूर रबमान यांची भेट घेऊन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
४. पोलिसांनी टिटू रॉय यांची सुटका करावी आणि त्यांच्या मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करावी, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होणार्या आक्रमणाविषयी त्यांनी खेद व्यक्त केला. अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणीही अधिवक्ता घोष यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात