जबलपूर (मध्यप्रदेश) : मानवता हाच मोठा धर्म आहे, असे म्हटले जात असले, तरी धर्माशिवाय मनुष्य केवळ पशू आहे. मनुष्याला मनुष्यत्वाचे भान केवळ धर्माने होत असते. आज व्यक्तिगत आणि सामूहिक रित्या धर्माचे पालन होत नसल्यामुळेच देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील कृषी विद्यापिठाच्या विश्रामगृहामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले,
‘‘विज्ञानाला समजण्यासाठी ‘थेअरी’समवेत आपण ‘प्रॅक्टीकल’ही करतो. अध्यात्मातही ‘प्रॅक्टीकल’ केल्याविना ‘थेअरी’च्या आधारावर आपले मत बनवणे अशास्त्रीय आहे. आज विज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. विज्ञान तुम्हाला सुविधा देऊ शकते; पण तुमचे दु:ख निवारण करू शकत नाही. मनुष्याचा स्वभाव, राग किंवा दु:ख यांवर नियंत्रण करणे केवळ अध्यात्मात शिकवले जाते; म्हणून वैज्ञानिक प्रगती नंतरही विदेशातील लोक आजही भारताकडून अध्यात्म शिकत आहेत. त्यासाठी आपण अध्यात्म समजून घेऊन आपले जीवन आनंदमय केले पाहिजे.’’ या बैठकीचे आयोजन श्री. सौरभ अवस्थी आणि श्री. मनीष यांनी केले होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या वेळी चलचित्राद्वारे ‘सनातन हिंदु धर्मातील वैज्ञानिकता’ विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
२. विद्यार्थ्यांनी धर्माशी संबंधित विविध प्रश्न जिज्ञासेने विचारून शंकानिरसन करून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात