गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झाट्ये यांना निवेदन सादर
पणजी : राजस्थान राजपूत समाज आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी गोव्यातील चित्रपटगृहांचे मालक तथा भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळल्याशिवाय चित्रपट राज्यात प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की, प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन स्त्रिया समाजापुढे नाचगाणे करत नसत, तर त्या प्रसंगी हातात समशेर घेऊन शत्रूंना नाचायला लावणार्या वीरांगना होत्या. असा जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असतांना त्यात मोडतोड करून भन्साळी यांनी चित्रपटातील घूमर या गाण्यात महाराणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे चित्रपट निर्मात्याला इतिहासात हस्तक्षेप करण्याची मुभा देत नाही. असे केल्यास तो घटनादत्त अधिकारांचा गैरवापर आणि भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अ नुसार दंडनीय गुन्हा आहे. कलेच्या स्वातंत्र्याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व इतिहासालाही आहे. तितकेच महत्त्व मनावर कोरलेल्या प्रतिमेला, श्रद्धेला, आदराला आहे, हे भन्साळी आणि कला स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे यांनी लक्षात घेतले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात