राऊरकेला (ओडिशा) येथे ‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन
राऊरकेला (ओडिशा) : आजच्या प्रचंड तणावमय, स्पर्धात्मक, भ्रष्टाचारी आणि असुरक्षित जीवनात मन संतुलित राखून जीवन आनंदमय करण्यासाठी जगातील कोणत्याही मनुष्याला गीतेतील तत्त्वज्ञान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी केले. ‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येथील ‘सरस्वती शिशू मंदिरा’च्या सभागृहात ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री. मालोंडकर पुढे म्हणाले, ‘‘वेद, उपनिषदे, पुराण, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांमध्ये संपूर्ण विश्वाला प्रेरक असे तत्त्वज्ञान समाविष्ट आहे. गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे. तथापि विद्यार्थ्यांनी केवळ गीतापठण करून न थांबता त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण म्हणजेच साधना केली पाहिजे. तरच आपण स्वत:, आपला परिवार, राष्ट्र आणि विश्व यांचे जीवन आनंददायी होऊ शकते.’’ या वेळी ‘चिन्मय मिशन’चे ब्रह्मचारी स्वामी निर्लिप्तानंद आणि ‘क्रियायोगा’चे स्वामी अनिर्वाणानंद गिरी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यालयीन, महाविद्यालयीन स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात