ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : आज राष्ट्र आणि धर्म यांवर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते आघातांच्या विरोधात कृती करतांना दिसत नाहीत. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांसारख्या अनेक समस्या हिंदूंसमोर आहेत. अशा वेळी धर्मशिक्षण घेणे, तसेच राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केले. येथील धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपस्थितांनी नियमितपणे राष्ट्र आणि धर्म यांसाठी वेळ देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
श्री. राजाराम रेपाळ यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष, तसेच हिंदू विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी हिंदु धर्मावर होत असलेले आघात, तसेच ‘धर्मकार्य यांसाठी हिंदू विधीज्ञ परिषद हिंदूंच्या पाठीशी सदैव उभी आहे’, असे सांगितले.
या चर्चासत्रासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बाळासाहेब गायकवाड, सेनापती श्री. अशोक वीरकर, श्री. उदय चव्हाण, श्री. महादेव पेठकर, शिवसेनेचे श्री. आकाश पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री धनंजय भोसले, अभिषेक जंगम, सुजित शिंदे, ईश्वरपूर अधिवक्ता संघटनेचे अधिवक्ता शशांक माने, अधिवक्ता आनंद देसाई, पाटीदार समाजाचे सर्वश्री किरीटभाई पटेल, हेमंत पटेल, विपुल पटेल, भाजपचे श्री. अर्जुन बाबर, हिंदु धर्माभिमानी श्री. प्रदीप पाटील यांसह २२ हून अधिक जण उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात