मरावनपुलावू सच्चिदानंदन् यांचा धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न !
भारतातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि केंद्र सरकार हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही करत नाही, हे या संघटना आणि सरकार यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चिदंबरमपुरम् (श्रीलंका) : येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत. यांपैकी ११ कुटुंबांचे धर्मांतर करण्यात मिशनरी यशस्वी ठरले आहेत. तेथील सुमारे १५४ हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याची मिशनर्यांची योजना आहे. याविषयीचे वृत्त कळताच श्रीलंकेत हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणारे नेते श्री. मरावनपुलावू सच्चिदानंदन् यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे.
श्री. सच्चिदानंदन् आणि हिंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) श्री. रामा रविकुमार यांनी तेथील हिंदूंमध्ये धर्मांतराच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. तसेच धर्मांतरित हिंदु कुटुंबांना परत हिंदु धर्मामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत.
१९ नोव्हेंबरपासून साजरा झालेल्या कंदा सष्टी सप्ताहानिमित्त त्यांनी चिदंबरमपुरम्मध्ये वास्तव्य करणे पसंद केले आहे. त्यांनी पलानी मुरुगन मंदिराच्या मुख्य विश्वस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा चालू केली आहे. या कालावधीत ते तेथील हिंदु कुटुंबांची भेट घेणार आहेत. तसेच धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
श्रीलंकेत हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंच्या घरांवर नंदीध्वज फडकावण्याचा उपक्रम
छेट्टीकुलम् (श्रीलंका) : श्रीलंकेत हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंच्या घरावर नंदीध्वज फडकावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत १९ नोव्हेंबर या दिवशी छेट्टीकुलम् महामार्गावर ६० फूट उंच नंदीध्वज फडकावण्यात आला. ‘ही पवित्र शिवभूमी आहे. येथे इतर धर्मियांनी हिंदूंचे धर्मांतर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी नंदीध्वजाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. श्री. मरावनपुलावू सच्चिदानंदन् यांच्या उपस्थितीत १५६ घरांच्या समोर नंदीध्वज उभारण्यात आले. छेट्टीकुलम् विभागामधील मुकंथकुलम् येथे प्रत्येक शैव घरासमोर नंदीध्वज फडकावण्यात आला. या वेळी शैव कुटुंबियांनी शिवस्तुती करणार्या श्लोकांचे पठण केले. अशा प्रकारचा उपक्रम सेल्वापुरम् आणि मन्नार येथे राबवण्यात येणार आहे. विदेशातील काही हिंदुत्वनिष्ठांनी श्रीलंकेतील हे उपक्रम पुरस्कृत केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात