भोसरी : इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या मैदानात २६ नोव्हेंबरला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे. सभेच्या निमित्ताने जवळपासच्या गावांमध्ये बैठका घेण्यात येत असून कोपरा बैठका, उद्घोषणा, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमांतून सभेच्या प्रसाराने वेग घेतला आहे.
चिंबळी, कुरुळी, मुळी या गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुळी गावातील श्री दत्ता गवारी यांनी ‘वैयक्तिक वाहनांविना शाळेच्या बसगाड्या घेऊन सभेला येऊ’, असे सांगितले, तर कैलास अण्णा फडके यांनी स्वतः प्रसार करून सभेपूर्वीच धर्मशिक्षण वर्ग चालू केला. यात महिलांचाही मोठा सहभाग असून सभेनंतर महिलांसाठी स्वतंत्र धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याचे ठरवले आहे.
काही जणांनी स्वतःहून गावात फ्लेक्स लावले. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे साहाय्य करावे लागले नाही. कुरुळी येथील श्री. संजय कड यांनी गावातून ४० जणांना घेऊन येणार असल्याचे सांगितले. चिंबळी गावातूनही ५० तरुणांनी सभेला येण्याची सिद्धता दर्शवली. विशेष म्हणजे या गावांमध्ये यापूर्वी कोणाचाही विशेष संपर्क नव्हता. पहिल्याच संपर्कात एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सर्व साधकांना ईश्वराप्रती कृतज्ञता वाटत असून ‘तोच ही सभा निर्विघ्नपणे पार पाडणार आहे’, असे वाटत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात