व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे ‘पर्यायी चिकित्सा पद्धती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
जे विज्ञानाला आता लक्षात आले, ते ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये ‘पर्यायी चिकित्सा पद्धती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६१ देशांतील वैद्यकीय तज्ञ सहभागी झाले होते. या वेळी भारताचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विद्यार्थी साहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या वैद्यकीय तज्ञांना ‘ओंकार साधना आणि ध्यानाची प्रक्रिया’ सप्रयोग सांगितली. ‘योगातून कर्मात कौशल्य येते. याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
१. ‘योगामधील ध्यान करतांना मेंदू पूर्ण सुप्तावस्थेत जातो आणि त्या वेळी नवीन चेतापेशी बनतात आणि जुन्या पेशींमधील डी.एन्.ए. लहान होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबते’, असे अमेरिकेतील ‘न्युरो स्पेशालिस्ट’ डॉ. पथिक वधवा यांनी सांगितले. याविषयी त्यांनी केलेले संशोधनही या वेळी मांडण्यात आले.
२. अमेरिका, रशिया, पोलंड, झेकरिपब्लिक आणि फिलिपिन्स या देशांच्या प्रतिनिधींनीदेखील योगाचे महत्त्व जाणून घेत त्यांचे विचार मांडले.
३. पॅरिस येथे पुढील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक परिषदेचे संयोजक आणि प्रमुख वक्ता म्हणून डॉ. आबनावे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. आबनावे यांनी यापूर्वी रशिया, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांतही विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात