अमेरिकेतील कोणत्याही व्यक्तीने कितीही म्हटले, तरी अमेरिका पाकवर कधीही कठोर कारवाई करणार नाही, हे उघड सत्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाला ९ वर्षे लोटली तरीही अद्याप या आक्रमणाचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात आलेला बिगर-नाटो मित्रदेशाचा दर्जा रहित करण्याची वेळ आली आहे, असे अमेरिकेतील आतंकवाद प्रतिबंधक क्षेत्रातील ब्रूस रिडेल या उच्चपदस्थ तज्ञाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला म्हटले आहे. हाफीज सईद याची लाहोर न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केल्यानंतर रिडेल यांनी वरील विधान केले आहे. हाफीज सईदवर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे (६४ कोटी ८० लाख रुपयांचे) पारितोषिक घोषित केले होते. तो जानेवारी मासापासून नजरकैदेत होता.
सईद याच्या सुटकेवर भारताने टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आतंकवादी घोषित केलेल्या सईदला मुख्य प्रवाहात आणण्याचा हा पाकचा प्रयत्न आहे. आतंकवाद्यांना कठोर शासन करण्याविषयी आणि सत्ताबाह्य शक्तींना पाठीशी घालण्याविषयी पाकिस्तान गंभीर नाही, हेच त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होत आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात